या ब्लॉगचा उद्देश एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.या ब्लॉगची सामग्री सोशल मीडियामधून घेतली आहे.

Saturday, March 9, 2019

सातवा वेतन

*सातवा वेतन आयोग : वेतन निश्चिती  व वेतन फरक*

१)     सहाव्या वेतन आयोगानुसार आपणास मिळणारा वेतन बँड प्रथम विचारात घ्यावा.
उदा. *श्री. सुनिल तुकाराम दरेकर* ( कन्या विद्यालय, श्रीगोंदा ) यांचा वेतन बँड  पीबी-२ रुपये ९३००-३४८००असा होता व या वेतन बँड मधील दि. १ जानेवारी २०१६ चे त्यांचे वेतन  १५०४० व ग्रेड पे ४३०० रु. होता. म्हणजे एकूण मूळ वेतन १९३४० रु. होते.
२)     सातव्या वेतन आयोगानुसार ४३०० रु. ग्रेड वेतनावरून पीबी-२ मधील वेतन स्तर निश्चित करावा. तो येतो एस-१४  (३८६००-१२२८००).

३)     दि. १ जानेवारी २०१६ ची वेतन निश्चिती :- १९३४० X २.५७  = ४९७०३.८० ( नजीकच्या रुपयात पूर्णांकित करून  ४९७०४ रुपये येते. एस १४ वेतन स्तरात ९ वा स्तर आहे ४८९००  व १० वा स्तर आहे ५०४००  म्हणून ४९७०४  या अंकाचा पुढील स्तर ५०४०० रु. येतो. म्हणून सुनिल दरेकर यांचे दि.१ जानेवारी २०१६ रोजीचे सुधारित वेतन रुपये ५०४०० निश्चित झाले.

४)     दि. १ जानेवारी २०१६ रोजी निश्चित झालेल्या सुधारित वेतनावर जून २०१६ पर्यंत   शून्य टक्के महागाई भत्ता विचारात घ्यावयाचा आहे व घरभाडे भत्ता सहाव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर म्हणजे १९३४० रु, वर १० टक्के घरभाडे भत्ता रु. १९३४  आकारावा. रु.४३९९  ग्रेड वेतनापर्यंत  ४०० रु. वाहन भत्ता दर आहे. म्हणजे  जानेवारी २०१६ चे एकूण वेतन ५०४००+०+१९३४+४००= ५२७३४  रुपये  येईल. सहाव्या वेतन आयोगात ते घेत होते ४५८४९ रुपये. परिणामी त्यांना त्या महिन्यात सातव्या वेतन आयोगानुसार  ६८८५ रुपये वाढ मिळेल. ती वाढ  जून २०१६ पर्यंत सहा महिने तशीच  चालू राहील.

५)     जुलै २०१६ मध्ये  १ तारीख ही सुनिल दरेकर यांची पगारवाढ असल्याने  सुधारित वेतन ५०४०० च्या ३ टक्के १५१२ रु.मिळवावेत.( ५०४००+१५१२= ५१९१२ येते . हा अंक नजीकच्या  शंभराच्या पटीत पूर्णांकित  करावयाचा आहे.  शेवटची दोन दशांश स्थळे ५० पेक्षा कमी असतील तर ती सोडून द्यायची आणि ५० किंवा ५० पेक्षा जास्त असतील तर पुढच्या शतकात तो आकडा घ्यावयाचा. म्हणून १२ सोडून देऊन ५१९०० रु. हे जुलै २०१६ चे  सुधारित वेतन  होईल. जर शेवटची दोन दशांश स्थळे ५० पेक्षा जास्त असती तर तो आकडा ५२०००  झाला असता.

६)     सुनिल दरेकर यांचा जुलै २०१६ चा पगार ५१९००  + २ टक्के म. भत्ता  १०३८+ सहाव्या आयोगाप्रमाणे दिलेला १० टक्के घरभाडे भत्ता १९९२ + वाहन भत्ता ४०० असे  एकूण ५५३३० रु. सुधारित वेतन होईल. ते सहाव्या आयोगात ४८६०६ रु. घेत होते. म्हणजे या महिन्यात ६७२४ रु वाढ झालेली आहे.ही वाढ  ६ महिने म्हणजे डिसेंबर २०१६ पर्यंत तशीच चालू राहील.

७)     जानेवारी २०१७ मध्ये सुधारित वेतनात बदल होणार नाही. पण म.भत्ता ४ टक्के होणार आहे. म्हणजे  ५१९०० च्या ४ टक्के २०७६ + सहाव्या वेतन आयोगातील १० टक्के घरभाडे भत्ता १९९२ + वाहन भत्ता ४०० रु. म्हणजे ५१९००+२०७६+१९९२+४००=५६३६८  एकूण सुधारित वेतन होईल. जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी सहाव्या आयोगाप्रमाणे ४९४०३ रु. वेतन घेतलेले आहे. या महिन्यात त्यांची वाढ ६९६५ रु. येईल व ती जून २०१७ पर्यंत सहा महिने  तशीच चालू  राहील.

८)     आता जुलै २०१७ मध्ये सुनिल दरेकर यांची  पगारवाढ असल्याने ५१९०० च्या ३ टक्के १५५७ त्यात मिळवावयाचे (५१९००+१५५७ = ५३४५७ येतील ते शतकात पूर्णांकित करावयाचे आहेत.ते येतात ५३५०० रुपये. त्यावर आता ५ टक्के म. भत्ता आकारावयाचा आहे. तो येतो २६७५ रु. आणि  सहाव्या वेतन आयोगातील १० टक्के घरभाडे भत्ता २०५२ + वाहन भत्ता ४०० रु. म्हणजे ५३५००+२६७५+२०५२+४००= ५८६२७  एकूण सुधारित वेतन होईल. जुलै  २०१७ मध्ये त्यांनी सहाव्या आयोगाप्रमाणे ५१४९५ रु. वेतन घेतलेले आहे. या महिन्यात त्यांची वाढ ७१३२ रु. येईल व ती डिसेंबर २०१७ पर्यंत सहा महिने तशीच चालू राहील.

९)     जानेवारी २०१८ मध्ये सुधारित वेतनात बदल होणार नाही पण म.भत्ता ७ टक्के होणार आहे. म्हणजे  ५३५०० वर  ७ टक्के ३७४५ + सहाव्या वेतन आयोगातील १० टक्के घरभाडे भत्ता २०५२ + वाहन भत्ता ४०० रु. म्हणजे ५३५००+३७४५+२०५२+४००=५९६९७  एकूण सुधारित वेतन होईल. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी सहाव्या आयोगाप्रमाणे ५२११० रु. वेतन घेतलेले आहे. या महिन्यात त्यांची वाढ ७५८७ रु. येईल व ती जून २०१८ पर्यंत  सहा महिने तशीच चालू राहील.

१०) आता जुलै २०१८ मध्ये  पगारवाढ असल्याने ५३५०० च्या ३ टक्के १६०५ त्यात मिळवावयाचे (५३५००+१६०५=५५१०५ येतील ते शतकात पूर्णांकित करावयाचे आहेत. ते  ५५१०० रु. येतात. त्यावर आता ९ टक्के म. भत्ता आकारावयाचा आहे. तो येतो ४९५९ रु. सहाव्या वेतन आयोगातील १० टक्के घरभाडे भत्ता २११४ + वाहन भत्ता ४०० रु. म्हणजे ५५१००+४९५९+२११४+४००=६२५७३  एकूण  सुधारित वेतन होईल. जुलै २०१८ मध्ये त्यांनी सहाव्या आयोगाप्रमाणे ५३६७३ रु. वेतन घेतलेले आहे. या महिन्यात त्यांची वाढ ८९०० रु. येईल व ती डिसेंबर २०१८ पर्यंत सहा महिने  तशीच चालू राहील.

११)  या प्रमाणे सुनिल दरेकर यांचा जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ अखेरच्या ३६ महिन्याचा एकूण थकबाकी फरक २ लाख ६५ हजार १५८ रुपये   निघणार असून सन २०१९-२० मध्ये ५३०३० रुपये, सन २०२०-२१ मध्ये ५३०३२ रुपये,  सन २०२१-२२ मध्ये ५३०३२ रुपये , सन २०२२-२३ मध्ये ५३०३२ रुपये आणि सन २०२३-२४ मध्ये ५३०३२ रुपये  असे एकूण २ ,६५,१५८ रुपये पाच वर्षात सुनिल दरेकर यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात  शासन दर जून महिन्यात  जमा करेल.

*सुधारित  वेतन  मॅट्रिक्समधील वेतनवाढीचा दिनांक*:-
विद्यमान वेतन संरचनेतील १ जुलै या वेतन वाढीच्या दिनांकाऐवजी सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये  १ जानेवारी किंवा १ जुलै असे दोन वेतनवाढीचे दिनांक असतील. कर्मचाऱ्यास त्याची नियुक्ती / पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ  ज्या तारखेस मिळाली असेल त्या तारखेनंतर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर  येणारी १ जानेवारी किंवा १ जुलै ही तारीख  वेतन वाढीची तारीख असेल. उदा. :-  २ जानेवारी ते १ जुलै या दरम्यान नियुक्ती / पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ  झाली असल्यास  त्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ  १ जानेवारी आणि  २ जुलै ते १ जानेवारी या  दरम्यान नियुक्ती / पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ  झाली असल्यास  त्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ  १ जुलै राहील. सहाव्या वेतन आयोगात सर्वांसाठी १ जुलै ही वेतनवाढ तारीख होती.

*वाहन भत्ता* :-  वाहनभत्ता  सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच राहणार असला तरी  महाराष्ट्र शासनाने दि. ३ जून २०१४ च्या शासकीय आदेशाने  दि. १ एप्रिल २०१४ पासून लागू केलेले वाहन भत्त्याचे पुढील दर लागू राहतील.

१)     ग्रेड वेतन ४३९९ रु. पर्यंत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना  शहरी व ग्रामीण भागात दरमहा ४०० रुपये वाहन भत्ता  राहील.

२)     ग्रेड वेतन ४४०० ते ५३९९ रु. असणाऱ्या कर्मचाऱ्यांना  शहरी भागात १२०० व ग्रामीण भागात दरमहा ६०० रुपये वाहन भत्ता राहील.

३)     ग्रेड वेतन ५४०० व त्यापेक्षा जास्त  असणाऱ्या कर्मचाऱ्यांना  शहरी भागात २४०० व ग्रामीण भागात दरमहा १२०० रुपये वाहन भत्ता राहील.

*टिप* :-  दि. १ एप्रिल २०१४ पासून वाहन भत्त्याच्या बदललेल्या  दराप्रमाणे कर्मचाऱ्यांचा वाहन भत्ता अनेक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाने काढलेला नाही . दि. १ एप्रिल २०१० पासूनचे जुने दर कर्मचाऱ्यांना दिले आहेत. उदा. ४६०० रुपये ग्रेड वेतन असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन  शिक्षकांना  *१ एप्रिल २०१४* पासून ग्रामीण भागात दरमहा ६०० रु. वाहन भत्ता द्यावयाला पाहिजे होता , तो दिलेला नाही. ज्या शाखांमध्ये अशी नजरचूक झालेली असेल त्यांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक काढतांना *देय* वाहन भत्ता (Due ) दरमहा ६०० रुपये दाखवावा व *दिलेला* वाहनभत्ता ( Drawn ) ४०० रुपये दाखवावा म्हणजे ३६ महिन्यांचा ७२०० रुपये फरक वंचित  कर्मचाऱ्यांना मिळेल व जानेवारी २०१९ पासून ४०० रु. ऐवजी ६०० रुपये वाहन भत्ता दाखवावा. ( *संदर्भ* :- शासन निर्णय क्रमांक : वाहभ-२०१४ / प्र.क्र.५ / सेवा-५ दि. ३ जून २०१४ )

*पदोन्नतीच्या पदांची वेतन निश्चिती :-*

१)ज्या कर्मचाऱ्यांची दि. १.१.२०१६ नंतर पदोन्नती झाली असेल त्यांची वेतन निश्चिती सुधारित नियम १३ नुसार  ज्या पदावरून पदोन्नती झाली असेल  त्या पदाच्या वेतन स्तरामध्ये एक वेतन वाढ देण्यात यावी. आणि अशा प्रकारे येणारी रक्कम  पदोन्नतीच्या पदाच्या वेतन स्तराच्या सेलमध्ये  असल्यास त्या रक्कमेवर वेतन निश्चिती करावे . मात्र असे  सेल  पदोन्नतीच्या  पदाच्या  वेतन स्तरामध्ये उपलब्ध नसल्यास लगतच्या पुढील सेलमधील  रक्कमेवर वेतन निश्चिती करण्यात यावी. उदा. क्ष या कर्मचाऱ्याला  दि. २९ जून २०१८ रोजी मुख्याध्यापकाची बढती मिळाली असेल व त्या कर्मचाऱ्याची १ जुलै २०१८ ही वेतन वाढ असेल तर त्या कर्मचाऱ्याने  १ जुलै २०१८ पासून विकल्प दिल्यास प्रथम उपशिक्षकाच्या वेतनश्रेणीतील  वेतनवाढ दिली जावी. त्यांनतर  त्याच वेतनश्रेणीतील पदोन्नतीची एक वेतनवाढ देऊन  मुख्याध्यापकाच्या वेतन स्तराच्या सेलमध्ये वेतन निश्चिती करण्यात यावी.

*दि. १ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त झालेले निवृत्तीधारक यांची वेतन निश्चिती :-*

 दि. १ जानेवारी २०१६ पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतन धारकांच्या विद्यमान मूळ निवृत्ती वेतनास  २.५७ ने गुणावे . त्यामध्ये  १ जानेवारी २०१६ ची शून्य टक्के महागाई विचारात घ्यावी.येणाऱ्या रकमेतून  विक्री केलेले ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे. त्यांनतर १ जुलै २०१६ पासून २ टक्के म.भत्ता मिळवून त्यातून ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे. त्यांनतर १ जानेवारी २०१७ पासून ४ टक्के म.भत्ता मिळवून त्यातून ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे. त्यांनतर १ जुलै २०१७ पासून ५ टक्के म.भत्ता मिळवून त्यातून ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे. त्यांनतर १ जानेवारी २०१८ पासून ७ टक्के म.भत्ता मिळवून त्यातून ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे. त्यांनतर १ जुलै २०१८ पासून ९ टक्के म.भत्ता मिळवून त्यातून ४० टक्के अंशराशीकरण वजा करावे व जी  रक्कम येईल ते सध्याचे  सातव्या आयोगाचे सुधारित निवृत्ती वेतन येईल. वरील माहितीच्या आधारे ३६ महिन्याचा फरकही काढता येईल. शासनाने जानेवारी २०१९ पासून या निवृत्तीवेतन धारकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतन दिलेले आहे.

*दि. १ जानेवारी २०१६ नंतर  निवृत्त झालेले निवृत्तीधारक यांची वेतन निश्चिती :-*

       दि. १ जानेवारी २०१६ ते दि. ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन प्रकरणे संबधित खात्याने ( निवृत्त झालेल्या कार्यालयाने ) महालेखापाल , मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठवून  सुधारित करण्यात यावीत.त्यानंतर त्यांना जिल्हा कोषागार कार्यालयाडून सातव्या आयोगाचे  सुधारित निवृत्ती वेतन मिळेल.तो पर्यंत सहाव्या वेतन आयोगाचे निवृत्ती वेतन त्यांना  चालू ठेवले जाईल.

*आश्वासित प्रगती योजनेनुसार तीन लाभ :-*

      कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे १०,२० व ३० वर्षाच्या  नियमित सेवेनंतरची  तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत  आश्वासित  प्रगती  योजना ( आ.प्र.यो ) ही दि. १ जानेवारी २०१६ पासून अमंलात येणार आहे. ही योजना वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर – २० पर्यंत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.म्हणजेच सहाव्या वेतन आयोगातील  पे बँड १५६००- ३९१००  व ग्रेड पे ५४०० या वेतन संरचनेतील  समकक्ष  कर्मचारी व अधिकारी यांना आ.प्र.यो. ही लागू राहील.  स्तर-२१ मध्ये वेतन आहरित करू लागताच , त्यांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.

१)     संपूर्ण सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार तीन वेळा या योजनेचा लाभ मंजूर केला जाईल.

२)     या योजनेच्या लाभार्थींना  विहित केलेली अर्हता, जेष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय परीक्षा  उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी, विभागीय चौकशी, न्यायिक प्रकरणे प्रलंबित नसणे, यथास्थिती जाती वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्य पध्दतीची  पूर्तता करणे आवश्यक राहील.

३)     ज्यांना १२ वर्षाचा ( वरिष्ठ वेतन श्रेणीचा ) एकच लाभ मिळाला असेल त्यांना दुसरा लाभ आणखी ८ वर्षाने म्हणजे २० व्या वर्षी मिळेल.

४)     ज्यांना १२/१२ वर्षाचे दोन लाभ मिळाले असतील त्यांना त्यांनतर ६ वर्षाने म्हणजे ३० व्या वर्षी तिसरा लाभ मिळेल.

५)     एकाच प्रवर्गात काम करणारांना हे लाभ दिले जातील. प्रवर्ग बदलताच कालावधी नव्याने मोजला जाईल.

*घरभाडे भत्ता :-*
      सातव्या वेतन आयोगाने दि. १ जानेवारी २०१६ ते दि. ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत घरभाडे भत्ता पूर्वी होता तसाच ठेवलेला आहे. दि. १ जानेवारी २०१९ पासून घरभाडे भत्ता  एक्स, वाय आणि झेड शहरांना  अनुक्रमे २४, १६ आणि ८ टक्के लागू केला जाणार आहे. सहाव्या आयोगात चे दर ३०,२०, आणि १० टक्के असे होते.

१)     महागाई भत्त्याच्या  दराने २५ टक्क्याची मर्यादा ओलांडल्यानंतर   वर्गीकृत शहरांना  अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे.
२)     महागाई भत्त्याच्या  दराने ५० टक्क्याची मर्यादा ओलांडल्यानंतर  वर्गीकृत शहरांना  अनुक्रमे ३०,२० आणि १०  टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे.
३)     दि. १ जानेवारी २०१६ ते दि. ३१ डिसेंबर  २०१८ या ३६ महिन्याच्या कालावधीत घरभाडेभत्ता  आणि वाहन भत्ता सहाव्या आयोगाप्रमाणे राहणार असल्याने या ३६ महिन्यात घरभाडे व वाहन भत्त्याचा काहीही फरक निघणार नाही.

*सातव्या  वेतन आयोगातील महागाई भत्त्याचे दर :-*

      दि. १.१.२०१६ पासून :- ० टक्के,  दि. १.७.२०१६ पासून :- २ टक्के,  दि. १.१.२०१७ पासून :- ४ टक्के, दि. १.७.२०१७ पासून :- ५ टक्के,  दि.१.१.२०१८ पासून :- ७ टक्के व  दि. १.७.२०१८ पासून :- ९ टक्के म. भत्ता दर लागू आहेत. दि. १.१.२०१९ पासून केंद्र शासंने १२ टक्के म.भत्ता लागू केलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाने तो अदयाप लागू केलेला नाही.

*व्यवसाय कर ( Profession Tax )*
      व्यवसाय कर सहाव्या वेतन आयोगात जसे लागू होते, तसेच ते लागू आहेत. त्यात बदल झालेला नाही. ज्या कर्मचाऱ्यांची मुले / मुली अपंग असतील त्यांना व्यवसाय कर माफ केला जातो.

*सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान :-*

१)     दि. १.१.२०१६ नंतर  सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर  अर्हताकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण सहामाही कालावधी करिता त्यांच्या सुधारित वेतनाच्या एक चतुर्थांश इतके  तथापि सुधारित
वेतनाच्या कमाल साडे सोळा पट किंवा १४ लाख रुपये या पैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहील.

२)     दि. १.१.२०१६ नंतर सेवेत असतांना  शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास , त्याच्या कुटुंबाला पुढील प्रमाणे *मृत्यू उपदान* मिळेल.

अ)    १ वर्षे अर्हताकारी सेवा :-  अंतिम वेतनाच्या दुप्पट

आ)   १ ते ५ वर्षे अर्हताकारी सेवा  :-  अंतिम वेतनाच्या सहा  पट

इ)      ५ ते ११ वर्षे अर्हताकारी सेवा  :- अंतिम वेतनाच्या १२ पट

ई)      ११ ते २० वर्षे अर्हताकारी सेवा  :- अंतिम वेतनाच्या २० पट.

उ)      २० वर्षापेक्षा  जास्त अर्हताकारी सेवा  :-अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाही कालावधीसाठी  अंतिम वेतनाच्या निम्मे , मात्र अंतिम वेतनाच्या ३३ पटीच्या मर्यादेत  ( कमाल मर्यादा १४ लक्ष रुपये )

  *अंशराशिकरणाचे  नवीन दर :-*
    सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना  आपल्या निवृत्ती वेतनाचे ४० टक्के अंशराशीकरण करावे लागते. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अंशराशीकरणाचे दर पूर्वीचेच राहतील. दि. १ जानेवारी २०१९ पासून अंशराशीकरणाचे नवीन दर लागू होतील.

    सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती, वेतन फरक आणि इतर अनुषंगिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात काही अॅप आलेले आहेत. त्यावरून वेतन निश्चिती आणि फरक तात्काळ काढता येतात. परंतु  वेतन निश्चिती आणि फरकाचे बारकावे समजत नाहीत. ते समजावेत म्हणून हा प्रपंच. मी दिलेल्या उदाहरणाबरहुकूम  आपण आपली वेतन निश्चिती करून  वेतन फरक काढू शकता.कृपया व्यक्तीगत फरक काढून देण्याचा आग्रह कोणी करू नये.
                                                                                                *प्रा. तुकाराम दरेकर*                                                                                                  निवृत्त प्राचार्य                                                                                                श्रीगोंदा ( ९४२२९१ ९६८८)
--------------०००-------

No comments:

Post a Comment